‘एसआरए’त नगरसेवक निधी वापरण्यासाठी परवानगी हवी ; नागरी सुविधा रखडल्याचा भाजपचा दावा

कोरोनाशी नागरिकांकडून मागील दीड वर्षापासून त्रास सहन करावा लागतो आहे. त्यात पावसाळ्यात विविध आजारांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे दुर्गंधी व रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

  मुंबई – मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून मुंबईतील सर्व एसआरए योजनांमध्ये मलनि:सारणवाहिन्या, जलवाहिन्या व इतर दुरुस्ती कामाकरिता नगरसेवक निधी व पालिकेच्या संबंधित खात्याचा निधी वापरण्याकरिता परवानगी द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे.

  महापालिकेने पोर्ट ट्रस्ट, म्हाडा, बेस्ट, पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग वसाहतींमध्ये जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्यांची दुरुस्ती, लादीकरण आदी मुलभूत सुविधांसाठी १५ डिसेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार परवानगी दिली आहे. त्या धर्तीवर पालिका आयुक्तांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून निधी वापरण्याची परवानगी द्यावी असे भाजपने म्हटले आहे.

  मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळावे म्हणून आधी शिवशाही प्रकल्प व नंतर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आले. या प्रकल्पात बिल्डरांनी झोपडपट्टी, चाळींमध्ये राहाणाऱ्या नागरिकांना त्यांनी बांधलेल्या संक्रमण शिबिरात तसेच पुनर्विकास इमारतीत स्थलांतरित केले. मात्र अनेक ठिकाणी पुनर्विकास इमारतीत पहिल्या

  पावसापासून गळती, जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्यांच्या तक्रारी रहिवाशांकडून केल्या जातात. अंधेरी येथील साईवाडी परिसरातील एसआरए इमारतींची तशीच स्थिती आहे. साईवाडी एसआरएमध्ये साईपार्वती (२८५ सदनिका), साईदत्त (२५० सदनिका) साईवंदना (१०० सदनिका) अशा सुमारे ६५० घरांच्या वसाहतीत मलनि:सारण वाहिन्या या गरजेपेक्षा कमी व्यासाच्या तसेच नादुरुस्त असल्याने येथे नियमितपणे सकाळ व संध्याकाळी या मलनि:सारण वाहिन्यांमधील घाण पाणी रस्त्यावरून वाहत असते. त्यातून येणारी दुर्गंधी आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना कसरत करून चालावे लागते, अशी माहिती भाजपाचे स्थानिक नगरसेवक अभिजीत सामंत यांनी दिली.

  कोरोनाशी नागरिकांकडून मागील दीड वर्षापासून त्रास सहन करावा लागतो आहे. त्यात पावसाळ्यात विविध आजारांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे दुर्गंधी व रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

  एसआरए योजना असल्याने मलनिस्सारण वाहिनी दुरुस्तीकरिता पालिकेच्या सध्याच्या नियमानुसार नगरसेवक निधी वापरता येत नाही तर दुसरीकडे एसआरए किंवा बिल्डर कोणतीही कार्यवाही करीत नाही, अशी तक्रार अभिजीत सामंत यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.