राज्यात एसटी बस सेवा सुरु, ५ महिन्यानंतर धावली पहिली दादर-पुणे बस

५ महिन्यांच्या कालावधीनंतर आता राज्यातील राज्यांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेरील वाहतुकीसाठी एसटी सज्ज झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीचा पर्याय मोकळा झाला आहे.

मुंबई : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च २०२० पासून देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे मागील ५ महिन्यांपासून सरकारी वाहतूक तसेच लोकल आणि रेल्वे सेवा सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आली होती. कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन केला होता. ३१ मे नंतर देशासह राज्यात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मधील अटी शिथिल करत आहेत. ५ महिन्यांच्या कालावधीनंतर आता राज्यातील राज्यांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेरील वाहतुकीसाठी एसटी सज्ज झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीचा पर्याय मोकळा झाला आहे. 

दादर एसटी स्थानकावरुन तब्बल ५ महिन्यानंतर दादर-पुणे ही पहिली शिवनेरी बस सकाळी ८ वाजता रवाना झाली. या बसमध्ये २० प्रवाशांनी प्रवास केला. आता राज्यातील जनजीवन पुर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. कोरोनाशी दिलेल्या ५ महिन्यांच्या लढ्या नंतर प्रवास करताना नागरिकांच्या मनात भीती होती, तसेच एसटी वाहतूक सुरु झाल्यामुळे जनतेला दिलासा मिळाल्याचा आनंद झाला आहे. 

राज्यांतर्गत एसटी, बसने प्रवास करताना ई-पासची गरज भासणार नसल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच खाजगी वाहनाने प्रवास करत असल्यास ई-पास बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.