गेल्या ३ दिवसांमध्ये २१ हजार ७१४ श्रमिकांना एस.टी.ने इच्छित स्थळी पोहचविले – अनिल परब

मुंबई: राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने ९ तारखेपासून आजपर्यंत म्हणजे गेल्या तीन दिवसांत आपल्या विविध आगारातील तब्बल ११६९ बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे २१

मुंबई: राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने ९  तारखेपासून आजपर्यंत म्हणजे गेल्या तीन दिवसांत आपल्या विविध आगारातील तब्बल ११६९ बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे २१ हजार ७१४ श्रमिक – मजुरांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचविले आहे,अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

माहिती देताना ते पुढे म्हणाले की,११ मे या एका दिवसात ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील ५३० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या ११ हजार ८६६  मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकातील सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले. अशा प्रकारे गेल्या तीन दिवसांत २१ हजार ७१४ मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात एसटी प्रशासन यशस्वी झाले आहे.
 भर उन्हात पायपीट करीत चाललेल्या या हजारो मजुरांना एसटी बसेसमध्ये बसवुन, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत  सोडण्यात, एसटी कर्मचारी मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे हे सर्व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. असे अॅड.परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल म्हटले आहे.या बरोबर काही ठिकाणी आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे देखील लाॅकडाउन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजूरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील श्रमिकांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.तरी त्यांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता , एसटी बसेसमधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी केले आहे.