स्टॅन स्वामींचा जामीन फेटाळला ; मुंबई विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय

कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झारखंडमधील नामकुम बगईचा येथील निवासस्थानावरून सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (८३) यांना अटक केली होती.

    मुंबई : एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांचा जामीन अर्ज सोमवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला.

    कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झारखंडमधील नामकुम बगईचा येथील निवासस्थानावरून सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (८३) यांना अटक केली होती. स्टॅन स्वामीच्या साथिदारांच्या भाषणानंतरच १ जानेवारी २०१८ मध्ये कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकला होता. तसेच त्यांचे माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून स्टॅन स्वामी हे कारागृहात आहेत.

    आपल्याला पार्किंसन्सचा त्रास असून आपले वय (८३) आहे. त्यामुळे काही ऐकू येत नाही, असा दावा करत वैद्यकीय कारणस्तव जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज स्वामी यांनी विशेष एनआयए दाखल केला होता. त्याला एनआयएकडून विरोधही कऱण्यात आला होता. त्या अर्जावर अतिरिक्त न्या. डी. ई. कोथळीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने गुणवत्ता आणि वेद्यकीय कारणावरून स्वामी यांचा अर्ज नाकारत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.