शुल्क तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरु करा

युवासेनेचे शालेय शिक्षण विभागाची मागणी मुंबई :मुंबईतील अनेक शाळांकडून पालकांना शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे अनेकदा पालकांना तक्रार कुठे करायची हा प्रश्न पडतो. पालकांच्या तक्रारी

युवासेनेचे शालेय शिक्षण विभागाची मागणी

मुंबई  :मुंबईतील अनेक शाळांकडून पालकांना शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे अनेकदा पालकांना तक्रार कुठे करायची हा प्रश्न पडतो. पालकांच्या तक्रारी आणि मार्गदर्शनासाठी शालेय शिक्षण विभागाने तातडीने हेल्पलाइन सुरु करावी अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे युवासेनेच्या सदस्यांनी केली आहे.

कोव्हीड-१९ विषाणूचे वाढते संक्रमण आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात  लॉकडाऊन करण्यात आले त्याचा फटका आर्थिकदृष्ट्या पालकवर्गाला बसला आहे. पालकांना यातून दिलासा मिळावा यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत शाळेचे शुल्क जमा करण्यातून सवलत देण्याबाबतचे  लेखी निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ३० मार्चला दिले आहेत.

 तसेच 8 मे रोजी शालेय शिक्षण विभागाने सर्व बोर्डाच्या व सर्व माध्यमांच्या शैक्षणिक संस्थामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता शुल्क वाढ न करण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. या अनुषंगाने सर्व संस्थांकडून आदेशाचे पालन होणे आवश्यक आहे. असे असताना अनेक  शाळा शासन निर्णयाचे पालन करत नसल्याची तक्रार पालकांकडून युवासेनेकडे करण्यात आली आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर या जिल्ह्यातील विभागीय उपसंचालकांच्या मार्फत पालकांना शाळा शुल्क व अन्य तक्रारी दाखल करण्यासाठी “हेल्पलाइन नंबर” सुरु करावेत यामुळे पालकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मद्दत होईल असे शिक्षणमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.