कोकणातील गणपती विशेष रेल्वे गाड्यांना राज्य सरकारचा ब्रेक?

राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात काल सोमवारी दिवसभर चर्चा सुरू होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत गाड्या सुटणार की नाही, याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेला विशेष गाड्या सोडण्यासाठी पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी कोकणातील विविध जिल्ह्यासांठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी केली होती.

मुंबई: येत्या २२ ऑगस्टपासून गणेशोस्तवास सुरूवात होणार आहे. तसेच राज्य सरकारने कोकणातील चाकरमान्यांना गावाकडे पोहोचण्यासाठी एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे विशेष रेल्वे गाड्या सुद्धा सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु आज मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा प्रस्ताव राज्य सरकराने खोळंबून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेला राज्य सरकारने तोंडी कळवलं आहे. मात्र रेल्वेने राज्य सरकारकडून ही सूचना लेखी मागवली आहे.

राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात काल सोमवारी दिवसभर चर्चा सुरू होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत गाड्या सुटणार की नाही, याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता.  राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेला विशेष गाड्या सोडण्यासाठी पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी कोकणातील विविध जिल्ह्यासांठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार ११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या गाड्या सोडण्यात येणार आहेत.

नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडीसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार होत्या. तसेच रेल्वे बोर्डाने १९० गणपती विशेष गाड्या सोडण्याची परवानगी दिली होती. मात्र, सोमवारी अचानक राज्य सरकारकडून गाड्या सोडू नयेत, असं तोंडी कळवण्यात आलं आहे. त्यामुळे कोकणवासीयांना गणपतीसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे की नाही, हे अद्यापही अस्पष्ट आहे.