१८ जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर तर पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर आला आहे. होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोविडचे सेंटर वाढवून तिथे आयसोलेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    मुंबई: कोरोनाची परिस्थिती लसीकरण, म्युकरमायकोसिस याचा आढावा घेणारी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये राज्यातील १८ जिल्ह्यामध्ये असणारी होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या १८ जिल्ह्यात बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, नागपूर यांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे लक्षणे नसलेले कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहता येणार नाही. तर त्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले .

    राज्यात सध्या २२४५ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने याला नोटीफाईड आजार घोषित केला आहे. रुग्ण आणि त्यांचाबाबतची माहिती शासनाला देणे बंधनकारक आहे. या आजाराच्या उपचारासाठी लागणारे एम्फोटेरेसिन इंजेक्शनचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकारकडून मिळालेले इंजेक्शनचे जिह्यांमध्ये वाटप करण्यात येत आहे. या आजारावर मोफत उपचार झाले पाहिजेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीत दिली.

    याबरोबरच राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर तर पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर आला आहे. होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोविडचे सेंटर वाढवून तिथे आयसोलेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. खासगी कोविड सेंटर रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार किंवा शासन ठरवेल त्या दराने बिल आकारावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एन्फोटेरेसिन इंजेक्शनचे ६० हजार व्हाईल्स १ जून रोजी राज्याला उपलब्ध होणार आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.
    .