राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचे निधन

  • त्यांच्यावर मागील महिन्यापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. अचानक प्रकृती खालावली आणि त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

मुंबई – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर मागील महिन्यापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. अचानक प्रकृती खालावली आणि त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. राजेश टोपेंच्या आईंचे नाव शारदाताई अंकुशराव टोपे वय ७४ वर्षे आहे. 

त्यांच्यावर  दि.२ ऑगस्ट रोजी सायं.४ वा.क.अं. टोपे.स.स.सा.का.अंकुशनगर ता.अंबड जि. जालना अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावर राजेश टोपेंनी आपली दुःखद भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती.दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील. अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. 

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राजेश टोपेंच्या आईला श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात असताना देखील राजेश टोपे यांनी कोरोनाविरुद्ध लढून महाराष्ट्राची काळजी घेतली. शारदाताई टोपे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

कोरोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राची काळजी घेतली आहे. त्यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु असतानाही ते महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार करण्यासाठी झटत होते. राजेश टोपेंच्या आईंची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले आहे.