एसटीच्या वाहतुकीद्वारे ४१ हजार ६०२ श्रमिक-मजुरांना मिळाला दिलासा – अनिल परब

मुंबई : राज्य शासनाच्या निर्देशानुसार गेली चार दिवस एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याच्या विविध भागांतून आपापल्या गावी पायी निघालेल्या हजारो श्रमिक - मजुरांना

 मुंबई : राज्य शासनाच्या निर्देशानुसार गेली चार दिवस एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याच्या विविध भागांतून आपापल्या गावी पायी निघालेल्या हजारो श्रमिक – मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचवण्याची मोहीम हाती घेतली आहे. आपल्या गावाची ओढ लागलेल्या श्रमिकांना एसटीचा आधार  मिळाल्याने  त्यांची उन्हा-तान्हातील कित्येक किलोमीटरची पायपीट वाचली आहे.त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असून या सर्वांनी  राज्य शासनाबरोबरच एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभागाचे आभार मानले आहेत, असे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी सांगितले आहे. मंत्री अॅड. परब म्हणाले की, आज एका दिवसात एसटीच्या ७५५ बसद्वारे १६ हजार ७३४ श्रमिक-मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. अशा प्रकारे गेल्या चार दिवसांपासून तब्बल २४०१ बसद्वारे ४१ हजार ६०२ श्रमिक-मजुरांची सुखरूप वाहतूक करून त्यांची उन्हातान्हातील कित्येक किलोमीटरची पायपीट वाचवली आहे. अर्थात, एसटी महामंडळाच्या या मोहिमेचे समाजातील सर्व घटकांकडून कौतुक होत आहे.