दीड कोटीचे बनावट फेविपिरावीर औषधांचा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाकडून मुंबईमध्ये कारवाई

फेविपिरावीर गोळ्यांचा बनावट साठ्याची मुंबईत विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली. याबाबत गोपनीयरित्या पडताळणी केल्यानंतर २४ मे रोजी प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी एकाच वेळी मुंबईतील तीन औषध विक्रेत्यांवर छापा घातला.

    मुंबई: कोरोनावरील उपचारांमध्ये परिणामकारक असलेल्या फेविपिरावीर औषधांच्या बनावट साठा अन्न व औषध प्रशासनाच्या (एडीए) गुप्तवार्ता विभागाने छापा घालून मुंबईमध्ये जप्त करण्यात आला. गोरेगाव पूर्वेकडील शिवसृष्टी सर्जी मेड, कांदिवली पूर्वेकडील मेडीटेब वर्ल्डवाईड व निरव ट्रेडलिंक या ठिकाणी धाड टाकून हिमाचल प्रदेशमधील मे. मॅक्स रिलीफ हेल्थकेअर कंपनीची फेविपीरावीर आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ही बनावट औषधे जप्त केली. हा औषधाचा साठा सुमारे १ कोटी ५४ लाखांचा आहे.

    फेविपिरावीर गोळ्यांचा बनावट साठ्याची मुंबईत विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली. याबाबत गोपनीयरित्या पडताळणी केल्यानंतर २४ मे रोजी प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी एकाच वेळी मुंबईतील तीन औषध विक्रेत्यांवर छापा घातला. यामध्ये गोरेगाव पूर्वेकडील शिवसृष्टी सर्जी मेड, कांदिवली पूर्वेकडील मेडीटेब वर्ल्डवाईड व निरव ट्रेडलिंक या विक्रेत्यांकडे मे. मॅक्स रिलीफ हेल्थकेअर कंपनीचे फेविपिरावीर आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा बनावट साठा जप्त केला.

    दरम्यान, पुढील चौकशीमध्ये मे मॅक्स रिलीफ हेल्थकेअर ही कंपनी हिमाचल प्रदेशमध्ये अस्तित्वात नसल्याची माहिती औषध नियंत्रक, हिमाचल प्रदेश यांनी इमेल द्वारे कळविली. तसेच राज्यातील घाऊक विक्रेत्यास विक्री केलेली संस्था मे मॅक्स रिलीफ हेल्थकेअर, गौतम बुद्ध नगर, नोयडा उत्तर प्रदेश या संस्थेस औषध विक्री परवाना नसल्याची माहिती मिळाली. मे मॅक्स रिलीफ हेल्थकेअर, सोलन, हिमाचल प्रदेश ही उत्पादन संस्था अस्तित्वात नसल्याने या कंपनीचा फेविपीरावीर साठा प्रतिबंधित करण्यासाठी सर्व राज्य औषध नियंत्रक यांना कळविण्यात आले.

    मे मॅक्स रिलीफ हेल्थकेअरचे मालक सुदीप मुखर्जी हे चौकशीसाठी हजर झाले असता त्यांच्याकडे औषध उत्पादन व विक्रीबाबत कोणतेच कागदपत्रे उपलब्ध होऊ शकले नाहीत. तसेच औषध उत्पादन व विक्री परवानाबाबत माहिती देऊ शकले नाहीत. मुखर्जी यांनी ज्या परवान्याच्या छायाप्रती सादर केल्या ते बनावट कागदपत्रे असल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले. याप्रकरणी समता नगर, कांदिवली पूर्व व गोरेगाव पूर्व पोलिस ठाण्यांमध्ये औषध निरीक्षकांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे १९४० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर मे मॅक्स रिलीफ हेल्थकेअरचे मालक सुदीप मुखर्जी यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.