भायखळा व दादर मार्केट परिसरात वाहतूक पोलिसांकडून होणारी कारवाई थांबवा ; श्रीरंग बरगे यांची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

या बाजारात स्वस्त दरात भाजी, फुले, फळे मिळत असल्याने छोटे व्यापारी, नागरिक खरेदीसाठी येत असतात. मात्र कारवाई होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतुकीला अडचण येणार नाही अशा ठिकाणी वाहने पार्क केली जात असतानाही कारवाई केली जाते.

    मुंबई: मुंबईतील प्रसिध्द भायखळा व दादर मार्केटमध्ये पहाटे खरेदीसाठी जाणाऱ्या व्यापारी व नागरिकांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते आहे. मार्केट परिसरातील रस्त्यावरील वाहतुकीस अडचण येणार नाही, अशा ठिकाणी वाहने पार्क केली जात असतानाही कारवाई होत असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिक हैराण आहेत. पहाटेच्यावेळी खरेदीसाठी येणारे नागरिक, व्यापाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करू नये अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

    दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई हा बहुतांशी कामगार वसाहती असलेला भाग आहे. येथील भायखळा व दादर ही गजबजलेली मोठी मार्केट आहेत. छोटे व्यापारी, नागरिकांना भाजी, फळे व फुले या मार्केटमधून खरेदी करावी लागते. या मार्केट मधील सर्व व्यवहार पहाटे पाच ते आठ वाजेपर्यंत चालतो. या दरम्यान रस्त्यावरील वर्दळही कमी असते. येथील पदपथाच्या बाजूच्या जागेत खरेदीसाठी येणारे व्यापारी व नागरिकांकडून वाहतुकीला अडचण येणार नाही, याचा विचार करून आपली दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग करीत आहेत. मात्र वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई केली जाते आहे. या कारवाईमुळे मार्केटमध्ये खरेदीसाठी येणारे छोटे व्यापारी, नागरिक त्रस्त आहेत. या बाजारात स्वस्त दरात भाजी, फुले, फळे मिळत असल्याने छोटे व्यापारी, नागरिक खरेदीसाठी येत असतात. मात्र कारवाई होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतुकीला अडचण येणार नाही अशा ठिकाणी वाहने पार्क केली जात असतानाही कारवाई केली जाते. त्यामुळे वाहने उभी तरी कुठे करणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ही समस्या लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पहाटेच्या वेळी पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आल्याचे बरगे यांनी सांगितले. या वेळी दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबा बाईत, सरचिटणीस कैलाश जाविर हेही उपस्थित होते.