on maratha reservation issue chief minister uddhav thackeray phone call to leader of opposition devendra fadnavis

मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे गरिब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे 20 हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सरासरी 450 ने दररोज बळीसंख्या वाढते आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रूग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रूग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे.

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबविली. परंतु ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. रेमडेसिवीर अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. परिणामी प्रचंड तुटवडा निर्माण झाला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून, त्यामुळे गरिबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. एकिकडे गरिब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. याबाबत तातडीने आपण निर्देश प्रशासनाला द्यावेत आणि गरिब रूग्णांचे प्राण वाचवावे, असेही या पत्रात म्हटले आहे.