दादाजी भुसे, कृषिमंत्री, महाराष्ट्र
दादाजी भुसे, कृषिमंत्री, महाराष्ट्र

शेतीत प्रयोग करणारे शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ असून त्यांच्या अनुभवातून व संकल्पनेतून फलित झालेल्या मॉडेलचा राज्यातील इतर शेतकऱ्यांना देखील लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात आली आहे. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. 

मुंबई (Mumbai). शेतीत प्रयोग करणारे शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ असून त्यांच्या अनुभवातून व संकल्पनेतून फलित झालेल्या मॉडेलचा राज्यातील इतर शेतकऱ्यांना देखील लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात आली आहे. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

राहुरी (जि. अहमदनगर) येथे कृषीभुषण डॉ. दत्तात्रय वने यांच्या शेतात झालेल्या कार्यक्रमात कृषीमंत्र्यांनी रिसोर्स बँकेतील शेतकरी बांधवांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्षचे पोपटराव पवार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह राज्यभरातून प्रयोगशील शेतकरी ऑनलाइन सहभागी झाले होते.

ठिबक सिंचनासाठी ८० ते ९० टक्के  अनुदान देण्याचा प्रस्ताव
माझी माय-वडिल शेतात राबायचे..शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमा करताना जे कष्ट करावे लागतात त्या साऱ्याचा मी जवळून अनुभव घेतल्याची आठवण कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितली. शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देतानाच ठिबक सिंचनासाठी ८० ते ९० टक्के  अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत शेतात प्रत्यक्ष प्रयोग केलेल्या नाविन्यपूर्ण बाबींवर आस्थेवाईकपणे संवाद साधत शेती पिक घेण्याबरोबरच विक्री करण्याची कला अंगीकृत असणे देखील महत्त्वाचे आहे त्यामुळे ‘विकेल ते पिकेल’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून वाटचाल करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. यावेळी शेतकरी बांधवांनी आपल्या काही संकल्पना मांडल्या. त्याबद्दल कृषी विभाग आपली भूमिका नक्कीच साकारेल. कारण एकमेकांच्या सहयोगाने, संकल्पेने आपल्याला कृषी क्षेत्राचा गाभा भक्कम करायचा आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या समस्या ही मांडल्यात त्याही आपण येणाऱ्या काळात मार्गी लावू, असे कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शेती आणि शेतकरी हा मुख्यमंत्र्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्या हिताचे जे करण्यासारखे आहे त्याकडे मुख्यमंत्र्यांचा कल असतो. म्हणून शहर असो किंवा ग्रामीण भाग जिथे जागा उपलब्ध होईल तिथे शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकाला कसा उपलब्ध होईल याकडे कृषी विभागाचा फोकस असणार आहे. ज्याअर्थी विक्रीतून शेतकऱ्यांना योग्य लाभ देखील घेता येईल. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून, साठवण क्षमता, शीतगृहे, माल वाहतुक, शेतमालावर प्रक्रिया यांना पाठबळ देण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतलेले आहे. त्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. यावेळी रिसोर्स बॅंकेतील शेतकऱ्यांच्या विभागनिहाय प्रतिनीधींनी शेतात केलेल्या विविदध प्रयोगांची माहिती दिली.