विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

प्रश्न मांडता येऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्नच उपस्थित होऊ नये, यासाठी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

मुंबई: दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या कार्यकाळावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी बोलताना लोकांचे प्रश्न मांडता येऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्नच उपस्थित होऊ नये, यासाठी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर जरुर खर्च करा पण आधी शेतकऱ्यांना पैसा द्या, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. दिल्ली, अमेरिकेवर बोलल्याने राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. बांधावर जाऊन दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मराठा, ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही आवाज बुलंद करणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला आहे. तर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी आरोप केला की, राज्यासमोर मराठा आरक्षण, शेतकरी, कोरोना असे अनेक प्रश्न असताना त्यावर चर्चाच करायची नाही म्हणून दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन ठेवले आहे.