छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ स्टेनलेस स्टीलचा मजबूत ‘हिमालय’ पूल!

अंधेरीत जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल १४ मार्च २०१९ रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला.

  • cst, mumbai

मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ लवकरच स्टेनलेस स्टीलचा मजबूत ‘हिमालय’ पूल उभारला जाणार आहे. स्टेनलेस स्टीलवर खाऱ्या हवेचा परिणाम होणार नसून गंजण्याचा धोकाही टळणार आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवाशांना बिनधास्तपणे ये-जा करता येणार आहे. पालिकेचे प्रमुख पूल अभियंता राजेंद्रकुमार तळकर यांनी ही माहिती दिली.

अंधेरीत जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल १४ मार्च २०१९ रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व रस्त्यावरील पूल, उड्डाणपूल, रेल्वे आणि पादचारी पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम वेगाने हाती घेतले आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कोविड रोखण्यासाठी काम करीत आहे. मात्र कोरोना लढ्यातही रस्ते, पूल आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कामेही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. यामध्ये महत्त्वाचे काम म्हणजे पुलांची दुरुस्ती आणि नव्या पुलांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत कोसळलेला हिमालय पूल पालिकेच्या माध्यमातून नव्याने बांधण्यात येणार आहे. या पुलाची मजबुती वाढविण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जाणार आहे. हिमालय पुलाच्या नव्याने होणाऱ्या बांधकामासाठी सात कोटींचा खर्च केला जाणार आहे. या कामासाठी आठवडाभरात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे तळकर यांनी सांगितले.

हँकॉक ब्रीज पावसाळ्याआधी पूर्ण होणार
माझगाव-सँडहर्स्ट रोडदरम्यानच्या हँकॉक ब्रीजचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या पुलाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलांचा ६५ मीटर लांबीचा आणि ६५० मेट्रिक टनांचा भलामोठा गर्डर बसवण्यात आला असून दुसरा गर्डरही लवकरच बसवला जाणार आहे. त्यामुळे हँकॉक ब्रीजचे काम मेपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही प्रमुख पूल अभियंता राजेंद्रकुमार तळकर यांनी दिली.

त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून पूल सुरू होण्यासाठी प्रतीक्षेत असणारे वाहनचालक, नागरिक-रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. माझगाव-सँडहर्स्ट रोडदरम्यान असणारा ब्रिटिशकालीन आणि १४१ वर्षे जुना हँकॉक पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे जानेवारी २०१६ मध्ये पाडण्यात आला. मात्र या अवाढाव्य पुलाचे बांधकाम गेली चार वर्षे रखडले होते. मात्र पुुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे प्रवासी नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.