परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी विद्यार्थी आंदोलन ; दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर जोरदार निदर्शने

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने चालवण्यात आले. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने परीक्षा सुद्धा ऑनलाईन घ्याव्यात, या मागणीसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अनेक दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे.

    मुंबई : वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला आता ऑफलाईन परीक्षा कशा देणार असा प्रश्न उपस्थित करत शुक्रवारी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी पार्कवर जोरदार आंदोलन केले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत असताना सरकार मात्र परीक्षा ऑफलाईन घेण्यावरच ठाम असल्याने विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली.

    आंदोलनाची वाढणारी तीव्रता लक्षात घेऊन, पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना मज्जाव करत बळाचा वापर केला. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने चालवण्यात आले. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने परीक्षा सुद्धा ऑनलाईन घ्याव्यात, या मागणीसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अनेक दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, नाशिक, नागपूर अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून विभागीय शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केली जात आहेत.

    काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये येऊन आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यावेळी शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी दादर येथील शिवसेना भवनसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दादर पोलिसांनी सेनाभवन समोर आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी शिवाजी पार्कमध्ये आंदोलन केले.

    यावेळी दोन परीक्षांमध्ये पुरेसे अंतर राखा, दहावीप्रमाणेच बारावीलाही बेस्ट ऑफ फाईव्हचा पर्याय द्या, अकरावीपर्यंत सरसकट उत्तीर्ण करा, कोणतेही दोन विषय ऑप्शनला टाकण्याची परवानगी द्या अशा मागण्या विद्यार्थ्यांनी आंदोलनातून केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मागण्यांचे फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली.

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही पालकही सहभागी झाल्याने शिवाजी पार्कमध्ये गर्दी वाढली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत त्यांना आंदोलन मागे घेत घरी जाण्याची विनंती केली. मात्र विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना हुसकावून लावताना पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाजी झाली. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळी थांबण्यास मज्जाव केला. विद्यार्थी शांततेने आंदोलन करत असताना पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी आंदोलनस्थळी केलेल्या दबावाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत इंडिया वाईड पेरेंटस् असोसिएशनचे प्रसाद तुळसकर यांनी या गंभीर प्रकाराबद्दल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.