विद्यार्थ्यांनी दिली वर्दीला पसंती – कलमापन चाचणीचा अहवाल जाहीर

मुंबई:दहावीची परीक्षा दिलेल्यांचा कलमापन व अभिक्षमता चाचणी अहवाल जाहीर करण्यात आला असून, या चाचणी अहवालात सर्वाधिक १९.३ टक्‍के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेत जाण्याकडे कल आहे. तर,

 मुंबई: दहावीची परीक्षा दिलेल्यांचा कलमापन व अभिक्षमता चाचणी अहवाल जाहीर करण्यात आला असून, या चाचणी अहवालात सर्वाधिक १९.३ टक्‍के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेत जाण्याकडे कल आहे. तर, १७.७ टक्‍के विद्यार्थ्यांचा कल हा ललित कला क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

राज्यातील २२ हजार ४८८ शाळांमधून इयत्ता दहावीच्या १५ लाख ७६ हजार ९२६ विाद्यार्थ्यांची कल अभिक्षमता चाचणी मोबाइल आणि कम्प्युटरच्या माध्यमातून घेण्यात आली. कृषी, कला-मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आणि गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे कल जाणून घेण्यात आली. यात २० टक्‍के मुलांचा पहिला प्राधान्य कल गणवेशधारी सेवेकडे आहे, तर १९.८ मुलींचा पहिला प्राधान्य कल ललित कला या क्षेत्राकडे असल्याचे दिसून येते. यामध्ये १६.८ विद्यार्थ्यांनी वाणिज्य क्षेत्राकडे दुसरे प्राधान्य दिले आहे. १६.१ मुलींचे तांत्रिक आणि १६ टक्‍के वाणिज्य ही दुसरी प्राधान्य असलेली कल क्षेत्रे आहेत. राज्यातील ९ विभागांपैकी ६ विभागांमध्ये गणवेशधारी सेवा आणि २ विभागांमध्ये ललित कला या क्षेत्राला पहिले प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातील ९ पैकी ८ विभागामध्ये वाणिज्य या कल क्षेत्राला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांचे प्राधान्य दर्शविते, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

कलमापन चाचणी बरोबरच कल अभिक्षमता चाचणीचा अहवाल १ मे रोजी www.mahacareermitra.in या पोर्टलवर दुपारी १ वाजल्यापासून उपलब्ध करून दिला आहे. अभिक्षमता चाचणी भाषिक, तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय अशा चार क्षेत्रासाठी घेण्यात आली.विद्यार्थ्यांना निकालापूर्वी पुरेसा अवधी मिळावा, ज्याद्वारे पुढील करिअर आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक सुयोग्य करिअरचा पर्याय निवडण्यासाठी विचार करता येईल, असेही राज्य शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

विद्यार्थ्यांचे क्षेत्रनिहाय कल 

१) गणवेशधारी सेवा : १९.३ टक्‍के 

२) ललित कला : १७.६ टक्‍के

३) वाणिज्य : १६.६ टक्‍के

४) कृषी : १३.५ टक्‍के

५) कला-मानव्यविद्या : १२ टक्‍के

६) आरोग्य व जैविक विज्ञान : १०.९ टक्‍के

७) तांत्रिक : ९.२ टक्‍के