रेल्वेसेवा कोलमडल्याने लोकसेवा परीक्षेपासून विद्यार्थी वंचित!

परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचू न शकल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. आयईएसच्या परीक्षेसाठी राज्यातील इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. या मेहनतीवर पावसामुळे पाणी फिरले आहे. परीक्षा केंद्रावर उशीराने पोचलेल्या प्रवेश नाकारल्यासंदर्भातील अनेक तक्रारी युवासेनेकडे आल्या.

    मुंबई: १७ जुलैच्या रात्री कोसळलेल्या मुसळधारांमुळे १८ जुलैला सकाळी मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वेसेवा पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे लोकसेवा आयोगाकडून १८ जुलैला घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसच्या (आयईएस) परीक्षेला उमेदवारांना वेळेवर केंद्रावर पोहोचणे शक्य झाले नाही. यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

    केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून १८ जुलैला इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसच्या (आयईएस) परीक्षेचे आयोजन केले होते. यासाठी मुंबईतील काही केंद्रावरही परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मुंबईसह आसपासच्या परिसरात रात्रभर झालेल्या जोरदार पावासामुळे रविवारी सकाळपासून मुंबईची लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवरही पाणी साचले होते. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याने उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य झाले नाही, तर काही उमेदवार विलंबाने पोहोचले.

    परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचू न शकल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. आयईएसच्या परीक्षेसाठी राज्यातील इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. या मेहनतीवर पावसामुळे पाणी फिरले आहे. परीक्षा केंद्रावर उशीराने पोचलेल्या प्रवेश नाकारल्यासंदर्भातील अनेक तक्रारी युवासेनेकडे आल्या.

    दरम्यान, परीक्षेला प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि त्यांच्या मानसिकतेवर होणार परिणाम लक्षात घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि महादेव जगताप यांनी शिवसेना सचिव आणि राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांना निवेदन देऊन पावसामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.

    मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पर्जन्यवृष्टी झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही. निसर्ग कोपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच याचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले.