दरवाजे, खिडक्या उघडल्याने शाळावर्ग घेणार मोकळा श्वास! शाळा भरवण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी-पालक-शिक्षकांना आनंद

ऑनलाइन शिक्षण सुरु असतानाही गेले दीड वर्ष आम्ही शाळेची नियमित साफसफाई करत होतो. मात्र, सलग अनेक महिने बहुतेक वर्गखोल्यांच्या खिडक्या बंद होत्या. आता शाळा पुन्हा सुरु होणार असल्यामुळे संपू्र्ण शाळा इमारतीची तसंच वर्गांचे दरवाजे, खिडक्या, कपाटं, फळा आदी फर्निचरची साफसफाई, फाॅगिंग आणि सॅनिटायजेशन करुन घेत आहोत.

    मुंबई : कोरोना महासंकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शहरी भागातील शाळांमध्ये इयत्ता आठवीपुढचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या वर्गांच्या दरवाजे आणि खिडक्या उघडल्या जातील आणि ‘शाळा मोकळा श्वास घेतील’, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

    ऑनलाइन शिक्षण सुरु असतानाही गेले दीड वर्ष आम्ही शाळेची नियमित साफसफाई करत होतो. मात्र, सलग अनेक महिने बहुतेक वर्गखोल्यांच्या खिडक्या बंद होत्या. आता शाळा पुन्हा सुरु होणार असल्यामुळे संपू्र्ण शाळा इमारतीची तसंच वर्गांचे दरवाजे, खिडक्या, कपाटं, फळा आदी फर्निचरची साफसफाई, फाॅगिंग आणि सॅनिटायजेशन करुन घेत आहोत.

    विद्यार्थी पुन्हा शाळेत येतील, तेव्हा शाळेतील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, अधिक निर्जंतूक व अधिक आरोग्यदायी असेल, याकडे आमचा कटाक्ष आहे अशी माहिती सायन येथील शिवशिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली. फाॅगिंग आणि सॅनिटायजेशनसाठी बाह्य खासगी संस्थेची सेवा घेत असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं.

    दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर काही गोंधळ असल्याची चर्चा सुरु आहे. “शाळा सुरु करण्याबाबतचे राज्य सरकार, महापालिका आणि आरोग्य विभागाचे नियम तसंच त्यादृष्टीने शाळेची तयारी याबाबत आम्ही शाळेत विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेणार असून प्रत्येक सरकारी आदेशाबाबत सविस्तर चर्चा करुन त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणार आहोत”, असं राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

    ‘विद्यार्थी शाळेत येण्यास उत्सुक असल्याचं पालक व शिक्षकांकडून सातत्याने सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करण्यास आम्ही सर्वजण उत्सुक आहोत’.
    – राजेंद्र प्रधान (अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल)