ड्रीम्स मॉल आगीचा चौकशी अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करा ; पालिका आयुक्तांचे आदेश

ड्रीम्स मॉल घटनेतील आगीचे नेमके कारण काय, त्याबाबत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्यासोबत सल्लामसलत करून कारणांची स्पष्टता करणे. मॉल तसेच त्यातील सनराईज रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व परवानगी/अनुज्ञप्ती (licence) देण्यात आल्या होत्या का, त्याची पडताळणी करून, दिलेल्या नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे.

    मुंबई: भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये काल शुक्रवारी लागलेल्या आगीची महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी गंभीर दखल घेतली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी या घटनेची चौकशी करून येत्या १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.पालिका आयुक्त इक्बास सिंग चहल यांनी उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे यांना या चौकशीचे आदेश दिले आहेत.

    ड्रीम्स मॉल घटनेतील आगीचे नेमके कारण काय, त्याबाबत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्यासोबत सल्लामसलत करून कारणांची स्पष्टता करणे. मॉल तसेच त्यातील सनराईज रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व परवानगी/अनुज्ञप्ती (licence) देण्यात आल्या होत्या का, त्याची पडताळणी करून, दिलेल्या नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे.

    अग्निसुरक्षा पालनाबाबतच्या उपाययोजना करण्यात मॉलचे मालक/व्यवस्थापन तसेच रुग्णालयाचे मालक/व्यवस्थापन यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या होत्या का, ते शोधून काढणे. अग्निशमन कार्यात काही त्रुटी होत्या का, त्याची कारणे शोधून काढणे. या घटनेच्या अनुषंगाने, इतर काही संदर्भित मुद्दे असल्यास ते आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये म्हणून योग्य त्या शिफारशी करणे.