मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक, वेस्टर्नवासियांची सुटका; जाणून घ्या वेळापत्रक

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात देखभार आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केलेला नाही. त्यामुळे वेस्टर्नवाल्यांची या जाचातून सुटका झाली आहे.

मुलुंड-माटुंगा अप व डाउन जलद मार्गांवर सकाळी ९.२० ते दुपारी २.२० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.५२ ते दुपारी १.५३ पर्यंत सुटणा-या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या शीव ते मुलुंड दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी ८.५५ ते दुपारी २.१३ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व मुलुंड ते दादर दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. परळ येथे या गाड्या अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान आणि
चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ पर्यंत वांद्रे / गोरेगाव करिता सुटणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटण्या-या आणि गोरेगाव / वांद्रे येथून  सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटण्या-या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.