रविवारी घराबाहेर पडणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच निर्णय घ्या कारण असा असेल मेगाब्लॉक ; वाचा बातमी

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोपरी येथील ब्रीज गर्डर लाँचिंगसाठी शनिवारी २३ जानेवारीमध्यरात्रीपासून ते रविवारी पहाटेच्या वेळेत रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप व डाउन जलद मार्गांवर सकाळी ११.०० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.२१ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि शीव ते मुलुंड दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. या गाड्या नियोजित वेळापत्रकानंतर १५ मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्यानंतर निर्धारित मार्गावर चालविण्यासाठी जलद सेवा मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ या वेळेत सुटणा-या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून मुलुंड ते दादर दरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. या सेवा नियोजित वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटांनंतर गंतव्यस्थानी पोहोचतील. दादरपासून पुढे जलद सेवा परळ येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

ठाणे-वाशी /नेरुळ ट्रान्सहार्बर मार्ग :

ठाणे-वाशी /नेरुळ अप व डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी / नेरूळ /पनवेल डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रात्री १०.३५ वाजल्यापासून ते सायंकाळी ४.१९ दरम्यान रद्द राहणार आहेत. पनवेल / नेरूळ / वाशी येथून सकाळी १०.१२ वाजल्यापासून ते दुपारी ४.०९ पर्यंत ठाण्याकरिता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. सकाळी १०.०० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.३० या वेळेत ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर लाइन / मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.