रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांनो तुमच्यासाठी वेळापत्रकात झालाय बदल? मगच निश्चित करा प्रवासाचा मार्ग

मध्य (central line) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (harbour line) आज देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या कामासाठी मेगाब्लॉक (megablock) घेण्याचे रेल्वेने निश्चित केले आहे.

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या कामासाठी मेगाब्लॉक घेण्याचे रेल्वेने निश्चित केले आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

सीएसएमटी येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल्स कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. मुलुंड येथून त्या अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्ग Sunday Mega Block On Harbour Line

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यात बेलापूर / नेरुळ-खारकोपर मार्गाचाही समावेश असणार आहे. पनवेल / बेलापूर येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी१०.४९ ते दुपारी ४.०१ वाजेपर्यंत बंद राहतील, तर सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत बंद राहतील.

अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाणेकडे जाणाऱ्या सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल / बेलापूर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरी रेल्वे गाड्या सीएसएमटी-वाशी विभागात चालविण्यात येणार आहेत. ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असणार आहेत.

पश्चिम रेल्वे Sunday Mega Block On Western Railway

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सकाळी १० : ३५ वाजल्यापासून ते दुपारी ३ :३५ वाजेपर्यंत बंद राहील.