या सर्व फाळणीच्या आठवणी जागवायच्या की विसरायच्या? संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना रोखठोक सवाल

फाळणीच्या काळात सीमावर्ती भागातील रेल्वे स्टेशनांवर फक्त अविश्वासाचेच वातावरण होते. ‘हिंदू पाणी, हिंदू चहा’ आणि ‘मुसलमान पाणी, मुसलमान चहा’ वेगवेगळय़ा स्टॉल्सवर विकले जात होते. या सर्व फाळणीच्या आठवणी जागवायच्या की विसरायच्या? पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेय, ‘फाळणी विसरू नका. असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट हा दिवस फाळणीचा स्मृती दिवस म्हणून पाळायचा असे फर्मान सोडले. या संदर्भात त्यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात ‘फाळणी विसरु नका’ असं आवाहन जनतेला केलं. याच निर्णयावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून भाष्य केलं आहे.

    तो एक भयपट

    हिंदुस्थानची फाळणी हा एक भयपट होता. फाळणीच्या वेळी दोन्ही देशांच्या सीमेवरील प्रांतांमध्ये झालेल्या अमानुष हिंसेने स्वातंत्र्याचा पहिला दिवस रक्ताने भिजला होता. पंडित नेहरू स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची जुळवाजुळव करीत बसले होते. सोबत इंदिरा गांधी होत्या. इतक्यात बाजूच्या खोलीतला पह्न वाजला. नेहरू आत गेले. ते फोनवर बोलू लागले, पण समोरून नीट ऐकू येत नव्हते. नेहरू वारंवार समोरच्या व्यक्तीस सांगत होते, ‘पुन्हा सांग! पुन्हा सांग!’ नेहरूंनी पह्न ठेवला व काळवंडलेल्या चेहऱयाने ते खुर्चीवर येऊन बसले. इंदिराजींनी विचारले, ‘‘काय झाले? कुणाचा फोन होता?’’

    ‘‘लाहोरचा फोन होता.’’ नेहरूंना सांगताना हुंदका फुटला. ते म्हणाले, ‘‘लाहोरच्या हिंदी वसाहतीमधील पाणी पुरविणाऱया सर्व लाइन्स दंगलखोरांनी तोडल्या आहेत. सकाळपासून तेथील लहान मुले, आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण करीत आहेत. हे काय चाललंय? मी रात्री देशवासीयांना भाषणात काय सांगू? त्यांना कसे तोंड दाखवू?’’

    या सर्व फाळणीच्या आठवणी जागवायच्या की विसरायच्या?

    फाळणीचे कोणतेही नियोजन नव्हते. कायदा-सुव्यवस्था, माणुसकी रस्त्यारस्त्यावर मुडद्याप्रमाणे पडली होती. या हिंसाचारात 10 लाख लोक मारले गेले. हजारो महिलांनी आपली इज्जत वाचविण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तर अनेक घरांत आपल्या बायका-मुली-सुनांना स्वतःच मारले, नराधमांच्या हाती लागून त्या महिलांचे जीवन खराब होऊ नये म्हणून.

    सीमावर्ती भागातील रेल्वे स्टेशनांवर फक्त अविश्वासाचेच वातावरण होते. ‘हिंदू पाणी, हिंदू चहा’ आणि ‘मुसलमान पाणी, मुसलमान चहा’ वेगवेगळय़ा स्टॉल्सवर विकले जात होते. या सर्व फाळणीच्या आठवणी जागवायच्या की विसरायच्या? पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेय, ‘फाळणी विसरू नका.’

    नथुराम गोडसेने गांधींना मारण्यापेक्षा जीनांवर हा प्रयोग झाला असता तर..

    ‘फाळणीचा दिवस विसरू नका,’ असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळय़ा झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ आली नसती!