sambhaji bhide, milind akbote

भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ८ जणांच्या नावाचा समावेश आहे. परंतु त्यात हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या नावाचा समावेश नाही. एकबोटे आणि भिडे गुरुजी या दोघांवरही गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव हिंसाचार (Koregaon Bhima riot case)  प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एकूण ८ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले (Supplementary chargesheet filed) आहे. यामध्ये फादर स्टॅन स्वामी, प्रो. आनंद तेलतुंबडे, प्रो. हनी बाबू, गौतम नवलखा, मिलिंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचाचे कार्यकर्ते ज्योती जगताप, सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांच्या नावांचा दोषारोपपत्रात समावेश आहे. मात्र, त्यात हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे ( Ekbote) आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांच्या नावाचा समावेश नाही. एकबोटे आणि भिडे गुरुजी या दोघांवरही गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

फादर स्टॅन स्वामींना अटक

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी फादर स्टॅन स्वामी (वय ८३) या जेसुइट धर्मगुरूना गुरुवारी एनआयएने अटक केली. आदिवासींसाठी काम करणारे स्वामी हे बंदी घातलेल्या सीपीआय माओअिस्ट या संघटनेचे सदस्य आहेत, असा दावा एनआयएने केला आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चौकशीनंतर सगळे आरोप स्वामी यांनी फेटाळले होते.

‘फादर स्टॅन स्वामी यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलंय. मोदी सरकार अशा लोकांना गप्प करण्याच्या माग आहे. कारण या सरकारासाठी कोळसा खाण कंपन्यांचा फायदा आदिवासींचं आयुष्य आणि रोजगाराहून अधिक महत्त्वाचा आहे’ असं इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी म्हटलंय.