राज्यात ॲम्फोटेरसिन-बी चा पुरवठा गरजेचेपेक्षा कमी; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

मुंबईत परिसरात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट होत असलल्याची माहिती पालिकेच्यावतीने अँड. अनिल साखरे यांनी न्यायालयाला दिली. तसेच रुग्णांच्या, बेडच्या उपलब्धतेबाबत पालिकेकडून अद्ययावत डॅशबोर्ड तयार होत आहे.

    मुंबई: कोरोनाच्या संकटानंतर आता राज्यात डोक वर काढत असलेल्या म्युकरमाकोसिस (काळी बुरशी)वरील ॲम्फोटेरसिन-बी या उपयुक्त इजेक्शनचा पुरवठा गरजेच्या तुलनेने अपुरा होत असल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला राज्य सरकारच्यवतीने महाधिवक्तांनी दिली. कोरोनासंदर्भातील विविध मुद्दांवर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांवर बुधवारी न्या. एस. पी. देशमुख आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, राज्यातील म्युकरमाकोसिसच्या रुग्णांची माहिती खंडपीठाला देण्यात आली. त्यानुसार राज्यात काळ्या बुरशीच्या ७५११ ॲक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ४३८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मागील आठवड्यात राज्यात ७५ रुग्णांचा काळ्या बुरशीमुळे मृत्यू झाला आहे. ॲम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचा १५ जूनपर्यंत एकूण पुरवठा पाच हजार ६०० कुप्यांचा करण्यात आला आहे. परंतु प्रत्येक ॲक्टिव्ह रुग्णामागे प्रतिदिवशी चार डोस दिले जातात. त्यामुळे चार हजार ३८० रुग्णांना एकूण १७ हजार ५२० कुप्या आवश्यक असून होणारा पुरवठा अपुरा आहे. येत्या काळात हाफकिन बायोफार्माकडून १८ ते २० जून या कालावधीत राज्य सरकारला ॲम्फोटेरसिन-बी च्या २२ हजार कुप्यांचा पुरवठा करणार असून २१ जून ते ३० जून या कालावधीत उर्वरित १८ हजार कुप्या उपलब्ध होणार असल्याची माहिती कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली. या अपुऱ्या औषधांच्या पुरवठ्याबाबत खंडपीठाने केंद्राकडे विचारणा केली असता महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात औषधांचा योग्य पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी सहा फार्मा कंपन्यांना या औषधांचे उत्पादन करण्यास परवाना दिला आहे. त्यात महाराष्ट्रातील हाफकिनचाही समावेश आहे. तसेच आम्ही अमेरिकेतील कंपनीकडूनही काही औषधे आयात करणार असल्याची माहिती केंद्राच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत आतापर्यंत अनेकांचे औषधांच्या कमरतेमुळे प्राण गेले आहेत. पण भविष्यात लोकांना हा त्रास पुन्हा सहन करावा लागणार नाही याची केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनी काळजी घ्यावी, असे अधोरेखित करत राज्य सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी २५ जूनपर्यंत तहतूब केली.

    मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत घट

    मुंबईत परिसरात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट होत असलल्याची माहिती पालिकेच्यावतीने अँड. अनिल साखरे यांनी न्यायालयाला दिली. तसेच रुग्णांच्या, बेडच्या उपलब्धतेबाबत पालिकेकडून अद्ययावत डॅशबोर्ड तयार होत आहे. डॅशबोर्डनुसार २४ तासात रुग्णांची संख्या, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडबाबत माहिती उपलब्ध होणार असल्याचेही साखरे यांनी सांगितले.