रिया चक्रवर्तीच्या घरावर एनसीबीचा छापा, मुंबई पोलिसांसोबत तपासकार्य सुरु

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (sushant singh death case) केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्ती (riya chakraborty) च्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. एनसीबी (ncb) ची टीम सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली आहे. रिया-शोविक ड्रग्ज प्रकरणी हा छापा टाकण्यात आला असून एनसीबीच्या पाच सदस्यांकडून तपासकार्य सुरु आहे. यावेळी मुंबई पोलीस(mumbai police) ही एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी पोहोचले आहेत. दरम्यान एनसीबीची दुसरी टीम सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडाच्या घरी पोहोचली आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

तपास यंत्रणांना रियाच्या मोबाइलमधून डिलीट करण्यात आलेले मेसेज मिळाले होते. यामध्ये रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यात अमली पदार्थांबाबत संवाद होते. रियाचा भाऊ शौविकचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसंच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बुधवारी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला होता.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आर्थिक अफरातफरीच्या आरोपाबाबत ईडीने रिया, तिचे वडील इंद्रजीत, भाऊ शोविक, व्यवस्थापक श्रुती मोदी, सॅम्युअल मिरांडा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार तपासादरम्यान रियाने मोबाइलमधून डिलीट केलेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश पुन्हा प्राप्त केले. यात अमली पदार्थाबाबतही संवाद आहेत. या संदेशांबाबत ईडीने सीबीआयसह एनसीबीलाही माहिती दिली. सीबीआयच्या तपासात सुशांतचा आचारी नीरज सिंह यानेही अमली पदार्थाशी संबंधित माहिती जबाबात दिली.