‘प्रांतिक अस्मितेचं राजकारण पुढे न्याल’; राज ठाकरेंनी दिल्या स्टालिन यांना सदिच्छा

सध्या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूमध्ये द्रमुक या पक्षाची सत्ता स्थापन होण्याचं चित्र दिसून येत आहे याठिकाणी द्रमुकने 118 जागांची मॅजिक फिगर पार केली आहे.

    मुंबई (Mumbai).  सध्या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूमध्ये द्रमुक या पक्षाची सत्ता स्थापन होण्याचं चित्र दिसून येत आहे याठिकाणी द्रमुकने 118 जागांची मॅजिक फिगर पार केली आहे. सध्या द्रमुक 119 जागांवर आघाडीवर आहे. द्रमुकचा सहकारी पक्ष काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे.

    दोन्ही पक्षांच्या आघाडीने सध्या राज्यात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे.एकूण 140 हून अधिक जागांवर द्रमुक आघाडी पुढे आहे. तर सत्ताधारी असणारा अण्णा द्रमुक 84 जागांवर पुढे आहे. त्यामुळे या निवडणुकीत अण्णा द्रमुकचा पराभव झाला आहे. याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी द्रमुकचे प्रमुख एम के स्टालिन यांचं अभिनंदन केलं आहे.

    त्यांनी म्हटंलय की, तमिळनाडू विधानसभेत स्टॅलिन ह्यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी, स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्ततेबद्दल आग्रही रहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.