कोरोना लसींबाबत केंद्राशी बोला, माध्यमांशी बोलून जबाबदारी संपत नाही; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला संतप्त सल्ला

    मुंबई :  राज्यात लसीच्या तुटवड्याबाबत आरोग्यमंत्री माध्यमांशी बोलतात त्याऐवजी त्यांनी केंद्र सरकारशी संवाद साधला पाहीजे असा संतप्त सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्यात तीन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा शिल्लक असल्याचे राजेश टोपे यांचे विधान केल्याने जबाबदारी संपत नाही असे फडणवीस म्हणाले. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी करताना महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसरीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केली आहे.

    सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला?

    राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते लसीकरणा संदर्भात करत असलेला आरोप चुकीचा आहे. राज्यातील लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक पुरवठा करण्यात येत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. केंद्र सरकारकडून देशभरात सर्वात जास्त लसी या महाराष्ट्राला दिल्या आहेत. या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी चर्चा करणे गरजेचे आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचे आणि हात झटकायचे हे बंद झाले पाहिजे. विरोधकांना राजकारण करु नका सांगायचे आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचे हे योग्य नाही, असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला.

    टाळेंबदी फसवी

    राज्यात विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि अन्य पाच दिवस कडक निर्बंध लावले जातील असे सरकारकडून सांगण्यात आले. पण आज सातही दिवस संपूर्ण लॉकडाऊन असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. कडक निर्बंध आवश्यक आहेत. पण आता जे निर्बंध घातले गेले आहेत, ते विचार न करता घातले गेले. मला १७ संघटनाचे लोक आतापर्यंत भेटले. आम्ही कोरोना उपाययोजनांबाबत सरकारला पूर्ण पाठिंबा दिला. पण आता कडक निर्बंधांऐवजी सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन दिसतो. यामुळे व्यापारी आणि छोटे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकाची फरफट होत आहे, यावर सरकारने चर्चा करुन मार्ग काढावा. अन्यथा उद्रेक होईल, असा सूचक इशाराही फडणवीसांनी राज्य सरकारला दिला. ते म्हणाले की, राज्य सरकारच्या बोलण्यात आणि करण्यात अंतर आहे. ज्या दिवशी सरकारने निर्बंघ लावण्याची घोषणा केली, तेव्हा ते योग्य वाटत होते. विकेंडला पूर्ण लॉकडाऊन आणि अन्य पाच दिवस पुणे किंवा नागपूर पॅटर्न राबवला जाईल असे सांगण्यात आले होते. पण आता सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन केल्याचे दिसत  आहे. पोलिसांकडून बळाचा वापर करुन निर्बंध लादले जात आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला.