तानसा व मोडक सागर ‘ओव्हर फ्लो’; आता पाणी कपातीचे ‘नो टेन्शन’

  मुंबई : मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने तुळशी आणि विहार पाठोपाठ तानसा आणि मोडक सागर ही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचे टेन्शन दूर झाले आहे. सातही धरणात ५५ टक्के पाणी साठा उपलब्ध झाल्याची माहिती मुंबई पालिकेच्या जलाभियंता विभागाने दिली.

  गुरुवारी (दि. २२) सातही धरणात ७ लाख ७९ हजार ५६८ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. ५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याने ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाल्याने ही मुंबईकरांसाठी खुशखबरच ठरली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सातही धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. १६ जुलैला तुळशी तर १८ जुलैला तलाव ओसंडून वाहू लागला. तर सात धरणांपैकी दोन मुख्य तलाव तानसा आज सकाळी ५.४८ मिनिटांनी ओव्हर फ्लो झाला. तर मोडक सागर ही आज पहाटे ३ वाजून २४ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मुंबईकरांचे पाणी कपातीचे टेन्शन टळले आहे.

  मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून मुंबईला रोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

  तीन वर्षांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  २०२१ – ७,७९,५६८
  २०२० – ४,१६,४२९
  २०१९ – ७,७८,१५९

  मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात ५५ टक्के म्हणजेच ७ लाख ७९ हजार ५६८ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध झाल्याची माहिती पालिकेच्या जलाभियंता विभागाने दिली आहे.