Tata does not get contract for Malad sewage treatment

मुंबई : पालिका प्रशासनाने अधिनियमांना डावलून एकाच कंत्राटदाराला सहा कामे दिली. स्थायी समितीत या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकत घेत, प्रस्ताव रद्द करण्याची सूचना केली. अखेर नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी देत, मालाड मलजल प्रक्रिया केंद्रातून टाटा कंसल्टन्सला बाहेरचा रस्ता दाखवला.

मुंबईतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सात ठिकाणी केंद्रे उभारली जाणार आहेत. पाच प्रक्रिया केंद्राच्या कामाला सुरुवात झाली. तर सहाव्या केंद्रासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. पालिकेने हे काम मे. टाटा कन्स्लटन्सीला देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीची पाचही कामे टाटाला दिली आहेत. मागील स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी यावरुन प्रशासनाला धारेवर धरले होते.

एका ठेकेदाराला दोन किंवा तीन कामे देण्याची अट आहे. तरीही एकाच ठेकेदाराला सहा कामे कशी दिली, पालिका अधिनियमांचा हा भंग आहे, अशी टीका करत प्रस्ताव बदलून आणण्याची सूचना नगरसेवकांनी केली होती. मात्र, प्रस्तावात कोणताही बदल न करता, प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला. नगरसेवकांनी यावरुन प्रशासनावर सडकून टीकास्त्र सोडले.

तसेच टाटा कंन्स्लटन्सी ऐवजी मे. एम. जे. एस. इंजिनिअर प्रा.लि. कंपनीला काम देण्यात यावी, अशी सूचना सभागृह नेते विशाखा राऊत यांनी केली. तर १८० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याचा  आणि एकाच ठेकेदाराला पाच कामे देण्याचा नियम नसताना मलजल प्रकल्प अभियंता हे धाडस कसे करतात. त्यांना तात्काळ निलंबित करुन चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केली.

पालिका अधिकाऱ्यांना डावलण्याचा प्रकार प्रशासन करत, असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या राखी जाधव यांनी केला. नगरसेवकांचा संताप आणि राऊत यांची उपसूचना लक्षात घेत टाटा कंन्सल्टंला काम देण्याचा प्रस्ताव रद्द केल्याची घोषणा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यानी केली. तसेच पुढील बैठकीत सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.