कोरोना काळातही कर्करुग्णांना टाटा हॉस्पिटलचा आधार

मुंबई : कोरोना काळात‌ टाटा रुग्णालयात उपचारासाठी मुंबईबाहेरुन आलेल्या रुग्णांना आधार देण्यासही टाटा मेमोरियल हॉस्पिटल पुढे सरसावले आहे. रुग्णाच्या शस्त्रक्रिया, रूग्णांना मूळ गावी परत जाण्यास व

मुंबई : कोरोना काळात‌ टाटा रुग्णालयात उपचारासाठी मुंबईबाहेरुन आलेल्या रुग्णांना आधार देण्यासही टाटा मेमोरियल हॉस्पिटल पुढे सरसावले आहे. रुग्णाच्या शस्त्रक्रिया, रूग्णांना मूळ गावी परत जाण्यास व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक परवान्यासह अॅम्ब्युलन्सचीही मदत हॉस्पिटलकडून करण्यात आली. कोरोनाच्या काळात अनेक कॅन्सर रुग्णालयांची दारे बंद असताना टाटा मेमोरियल रुग्णालयाने कॅन्सरचे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची विशेष खबरदारी घेतली. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मॅनेजमेंटने सर्व कर्करोगाच्या रुग्णांसाठी श्रमिक गाड्यांमध्ये अतिरिक्त बोगीसाठी द्यावी अशी मागणी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ आर. बडवे यांनी रेल्वेकडे केली. आणि त्यामुळे २०० रुग्ण आणि नातेवाईकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यास मदत झाली. 

कोविडचा प्रसार वाढत असताना कॅन्सरच्या रुग्णाना उपचारात मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. या समस्यांची माहीती घेत टाटा मेमोरियल रुग्णालयाने मात्र अशा रुग्णांसाठी सर्व सुविधा सुरू ठेवल्या. लॉकडाऊन दरम्यान टाटाचे बरेच रुग्ण मुंबईच्या विविध भागात अडकले होते. त्यातील बरेच रुग्ण पदपथांवरही राहत होते. अशा रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकाची सोय सर्वोदय रुग्णालय घाटकोपर, श्रद्धा फाउंडेशन खारघर, उत्कर्ष निवारा गृह खारघर, हॉटेल जैद आंतरराष्ट्रीय अंधेरी, आहुजा कम्युनिटी हॉल वांद्रे अशा ठिकाणी केली. कोरोना विषाणूंचा प्रभाव लक्षात घेत काही टक्के काम कमी वेगाने चालू होते. मात्र रुग्णांना सुविधा देण्यावर टाटा रुग्णालयाने भर दिला. यामध्ये शस्त्रक्रिया करणे, केमोथेरपी, रेडिओथेरपी सुरू ठेवली. त्याचसोबत सर्व निदानाची चाचण्या करणे चालू ठेवले आहे. 
 
कोरोना महामारीतही आणि लॉकडाऊनच्या काळात रूग्णांना त्यांची राहण्याची व्यवस्था, भोजन आणि वाहतुकीची व्यवस्था करुन मदत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.  बर्‍याच सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि देणगीदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे, असे टाटाचे जनसंपर्क अधिकारी जाफरी यांनी सांगितले.