
अखेर अॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन द्यावं लागलं. यासोबतच अॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची माहिती देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
- अखेर अॅमेझॉनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठीचा समावेश करण्याचं आश्वासन
मुंबई (Mumbai). अखेर अॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन द्यावं लागलं. यासोबतच अॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची माहिती देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
“अमेझॉनला धडा शिकवला. सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन.” अशा शब्दांमध्ये ट्विट करून संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे प्रचंड आक्रमक झाली होती. राज्यभरात विविध ठिकाणची अॅमेझॉनची कार्यालयं फोडली गेली. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. तसेच, ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी देखील मनसैनिकांकडून करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना व अॅमेझॉन यांच्यात मराठीच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादात, अखेर अॅमेझॉनला मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे माघार घ्यावी लागली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर मनसैनिकांनी अधिकच आक्रमक होत, राज्यभरातील अॅमेझॉनची कार्यालयं फोडण्याचा सपाटा सुरू केला होता.
अमेझॉन ला धडा शिकवला. सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन@akhil1485
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 26, 2020
राज ठाकरेंना नोटीस
मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली होती. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया देखील मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली होती.
काय आहे नेमका वाद
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.
विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.