
अधिकृतपणे अद्यापही सरकारने रिक्षा व्यवसायाला परवानगी दिलेली नाही. मात्र जगण्यासाठी रिक्षाचालक रिक्षा चालवीत आहेत. त्यांना दरमहा १० हजार सरकार देऊ शकत नाही. त्यांच्या इतर मागण्या पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे भाडेवाढ करून कोणाचाच प्रश्न न सुटता, मुंबईकरांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल, अशी भूमिका प्रवासी संघटना आणि वाहतूक संघटनेकडून घेण्यात आली आहे.
मुंबई : अनेक वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झालेली नाहीये. कोरोना महामारीच्या काळात रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना बंदमुळे खूपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, त्यामुळे टॅक्सीसाठी ३ रुपये प्रति किमी आणि रिक्षासाठी २ रुपये प्रति किमी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनची झळ सर्वच नागरिकांना बसली आहे. त्यामुळे आधीच खिसा कापलेला असताना आणखीन दरवाढ का, असं आश्चर्य मुंबईकरांनी व्यक्त केलं नाही तर नवलंच.
अधिकृतपणे अद्यापही सरकारने रिक्षा व्यवसायाला परवानगी दिलेली नाही. मात्र जगण्यासाठी रिक्षाचालक रिक्षा चालवीत आहेत. त्यांना दरमहा १० हजार सरकार देऊ शकत नाही. त्यांच्या इतर मागण्या पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे भाडेवाढ करून कोणाचाच प्रश्न न सुटता, मुंबईकरांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल, अशी भूमिका प्रवासी संघटना आणि वाहतूक संघटनेकडून घेण्यात आली आहे.
मुंबईकरांचे जगणे कठीण झाले आहे. रेल्वे सुरु नसल्याने प्रवाशांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. पगार कपात होणे, कामाचे वाढलेले अतिरिक्त तास, नोकरी जाण्याची भीती, कोणाकडून उधारी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टया मुंबईकर पिचला गेला आहे. त्यामुळे सरकारने भाडेवाढ करू नये असं म्हणणं यात्री संघचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी मांडलं.
२२ डिसेंबर रोजी मुंबईतील टॅक्सी, रिक्षांची भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे चालू नसल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना रेल्वेचे प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे भाडेवाढ होणे गरजेचे आहे. मात्र भाडेवाढ ५ किंवा १० रुपयांची होणे अपेक्षित आहे. कारण पुन्हा २ ते ३ रुपयांमुळे सुट्टे पैसे देणे-घेण्यामुळे गोंधळ, भांडणे होण्याची शक्यता आहे, असं ए. एल. क्वाड्रोस ( सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन) यांनी स्पष्ट केलंय.
कोरोना काळात प्रत्येकाची स्थिती हलाकीची झाली आहे. त्यामुळे दरवाढ करणे हा मार्ग योग्य नाही. रिक्षाचालकांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी १० हजार रुपये महिना देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २ ते ३ रुपये वाढविणे योग्य नाही, असं शशांक राव (अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन)यांनी सांगितलं.
तर, २२ डिसेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीसंदर्भात चर्चा होणार आहे.त्यानंतर भाडेवाढ होणार की नाही, हे ठरणार आहे असं परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केलं.