टॅक्सी-रिक्षाची भाडेवाढ होणारच; येत्या १५ दिवसांत निर्णय घेणार असल्याची अनिल परबांची माहिती

मुंबई : गेल्या काही वर्षांत न झालेली भाडेवाढ आणि कोरोनाकाळात काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सीचालकांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे टॅक्सी-रिक्षाची भाडेवाढ करावी, अशी मागणी टॅक्सी-रिक्षा संघटनांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे नुकतीच केली आहे. याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन परिवहनमंत्र्यांकडून संघटनांना देण्यात आले आहे. १५ दिवसांत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

मीटरवर धावणाऱ्या रिक्षाचे सध्याचे भाडे १८ रुपये आणि टॅक्सीचे २२ रुपये भाडे आहे. जून २०१५ मध्ये टॅक्सीच्या भाडेदरात १ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे २१ रुपयांवरून भाडे २२ रुपये झाले होते. तर याच वर्षांत रिक्षाच्याही भाडेदरात एक रुपयांची वाढ झाली होती. ही भाढेवाढ हकिम समितीनुसार प्रत्येक वर्षी दिली जात होती.

मात्र, या समितीच्या सूचना प्रवाशांच्याही हिताच्या नसल्याने त्याविरोधात प्रवासी संघटनांनी विरोध दर्शविला. त्यानंतर एकसदस्यीय खटुआ समितीची शिफारस करण्यात आली, परंतु रिक्षा-टॅक्सीच्या भाडेदरावर मात्र काही निर्णय झाला नाही. रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीसंदर्भात सातत्याने परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करतानाच परिवहनमंत्री, सचिव, परिवहन आयुक्तांच्या भेटीगाठीही घेतल्या. अखेर यावर विचार केला जात असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काही वर्षांपूर्वी रिक्षा परवाने खुले केले. त्यामुळे रिक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली.  परिणामी वाहतूक कोंडीही होऊ लागली. काहींनी नुसतेच परवानेदेखील घेऊनही ठेवले. त्यामुळे या परवान्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणीही संघटनांनी केली आहे.

पाच वर्षांत टॅक्सीची भाडेवाढ झालेली नाही. कोरोनाकाळात चालकांचे उत्पन्नच बुडाले. त्यामुळे आता २२ रुपयांवरून २५ रुपये भाडेदर करण्याची मागणी केली आहे, परंतु सरकार जी भाडेवाढ देईल, ती मान्य करू असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे म्हणणे आहे.