शिक्षक दिनापूर्वी शिक्षकांचे मोठे टेन्शन दूर होणार; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबईतील ७० टक्के शिक्षक शिक्षकेतर लगतच्या ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील मनपा क्षेत्रात तसेच उपरोक्त जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामीण भागात राहतात. तसेच शाळा अद्यापही सुरु नसल्याने शिक्षक घरून ऑनलाईन वर्ग आणि शिकविण्या घेत आहेत. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या निवास्थानाजवळील विधानसभा क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर प्राधान्य द्यावे अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

    मुंबई: राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आरोग्य विभागाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद यांना दिले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक दिनापूर्वी शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता आरोग्य विभागही कामाला लागले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच शिक्षकांचे लसीकरणास वेग येईल.

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ५ सप्टेंबरपूर्वी सर्व शाळांतील शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या लसींव्यतिरिक्त २ कोटी अधिक लस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली होती. या पार्श्वभूमीवर आता अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कार्यालयाकडून राज्यातील सर्व महानगरपालिका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ५ सप्टेंबरपर्यंत शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    जिल्हा व महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य विभाग व शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने सरकारी व खाजगी शाळामधील शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करावे, जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळेतील कोविड १९ लसीकरण न झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लाभार्थी यांच्या यादी शालेय शिक्षण विभाग यांच्याकडून घेण्यात यावी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड लसीकरण हे प्राधान्याने सध्या सुरु असलेल्या कोविड लसीकरण केंद्रांवर करण्यात यावे व आवश्यकता भासल्यास सदर लाभार्थ्यांसाठी वेगळे प्लॅन करण्यात येवून लसीकरण करण्यात यावे त्याचबरोबर लसीकरणाबद्दलची संपूर्ण माहिती कोविन पोर्टलवर नोंद करण्यात यावी अशा सूचना आरोग्य विभागाने सर्व पालिका तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना कळवले आहे.