
तेजस ठाकरे यांनी याची माहिती आपल्या इन्स्टाग्राम पेजवर दिली असून अमेरिकेतील जर्नलमध्ये ती प्रकाशित झाली आहे. चन्ना स्नेकहेड या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचे नाव देणार असल्याचे तेजस ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे हे दऱ्या-खोऱ्यात जाऊन संशोधन करत असतात. त्यांना नवनवीन गोष्टींचा शोध लावण्याची आवड आहे. तेजस ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र, सह्याद्री पर्वतरांगांत केलेल्या संशोधनात अनेक प्रजातींचा शोध लावला आहे. आता त्यांनी मेघालयातील खासी टेकड्यांतून दुर्मिळ असा चन्ना स्नेकहेड या माशाचा शोध लावला आहे.
तेजस ठाकरे यांनी संशोधनात माशाचा शोध लावला याची दखल अमेरिकेतील ‘कोपिया-अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अॅण्ड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नलने घेतली. याच जर्नलमध्ये तेजस ठाकरे यांच्या संशोधनाबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती.
मेघालयातील या संशोधनात त्यांच्यासह जे. कृथ्वीराज, एस. गजेंद्रो, ए. उमा, एन मौलीथरन आणि एम. बँकीट हे संशोधकही सहभागी झाले. मेघालयातील डोंगर कपाऱ्या, टेकडय़ा पिंजून काढताना त्यांनी या अत्यंत सुंदर अशा दुर्मिळ माशाचा शोध लावला. या माशाचे वर्णन करणारा शोधनिबंध तयार करून त्यांनी तो अमेरिकेतील ‘कोपिया – अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अँड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ला पाठवला. हे संशोधन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले.
निळ्याशार सौंदर्याचा आनंद घ्या
तेजस ठाकरे यांनी याची माहिती आपल्या इन्स्टाग्राम पेजवर दिली असून अमेरिकेतील जर्नलमध्ये ती प्रकाशित झाली आहे. चन्ना स्नेकहेड या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचे नाव देणार असल्याचे तेजस ठाकरे यांनी म्हटले आहे. ऑरिस्टॉन यांनी पहिल्यांदा ही प्रजाती शोधली आणि या प्रजातीचे संशोधन करण्यात तेजस ठाकरे यांच्या टीमलाही त्यांनी मोठे सहकार्य केले, अशी माहिती देतानाच निळय़ाशार माशाच्या सौंदर्याचा आनंद घ्या, असे तेजस ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुत्र तेजस ठाकरे यांनी आपल्या संशोधनात आतापर्यंत ११ दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे. यामध्ये खेकडे, पाल, आणि इतर वन्य जिवांचा समावेश आहे. मागील काहि दिवसांपूर्वी त्यांनी हिरण्यकेशी माशाचा शोध लावला होता.