दहावीचे विद्यार्थी कोट्यातील गुणांना मुकणार ? प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

कोट्यातील गुणांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे(marks from quota) प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळांना(school students) १५ जानेवारीपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. ही मुदत कमी असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी राज्य मंडळाकडे(state board) केली आहे.

मुंबई :कोट्यातील गुणांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे(marks from quota) प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळांना(school students) १५ जानेवारीपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. ही मुदत अपुरी असल्याने खेळ, चित्रकला, शास्त्रीय कला क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेले तसेच लोककला प्रकारात सहभाग घेतलेले दहावीचे विद्यार्थी कला कोट्यातील वाढीव २५ गुणांना मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ही मुदत कमी असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी राज्य मंडळाकडे केली आहे.

राज्य मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने १२ जानेवारीला परिपत्रक जारी करून कोट्यातील वाढीव गुणांचे प्रस्ताव १५ जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना शाळांना दिल्या. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पण मंडळाच्या या सूचना चुकीच्या असल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील शाळा बंद असून अनेक विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यासाठीही शाळेत आलेले नाहीत. अशा परिस्थितीत कोट्याचे प्रस्ताव कसे सादर करणार, हे प्रस्ताव सादर करण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून द्यावी, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये होणारी एलिमेंटरी आणि इंटरमिजीएटची परीक्षा झालेली नाही. दहावीच्या परीक्षेला बसणारे १० ते १५ टक्के विद्यार्थी ही परीक्षा देतात पण परीक्षाच न झाल्याने हे विद्यार्थी वाढीव गुणांना मुकण्याची शक्यता आहे. इतर परीक्षांप्रमाणे योग्य खबरदारी घेऊन एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट परीक्षांचे आयोजनही कला संचालनालयाने करावे अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.