टेस्ला कंपनीची महाराष्ट्राऐवजी ‘या’ राज्याला सर्वाधिक पसंती, घुमजावनंतर मनसेची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

या कंपनीने महाराष्ट्राऐवजी कर्नाटक राज्याला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. तसेच ही कंपनी बंगळुरूमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे. दरम्यान, घुमजावनंतर मनसेने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

मुंबई : इलेक्ट्रीक कार बनवणारी कंपनी टेस्लाची भारतात एन्ट्री झाली आहे. परंतु या कंपनीने महाराष्ट्राऐवजी कर्नाटक राज्याला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. तसेच ही कंपनी बंगळुरूमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे. दरम्यान, घुमजावनंतर मनसेने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या टीमसोबत २२ ऑक्टोबर २०२० रोजी प्राथमिक चर्चाही केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली होती. परंतु टेस्लाने महाराष्ट्रऐवजी कर्नाटकला पसंती देत बंगळुरुमध्ये नोंदणी केली. त्यानंतर टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज ३ मंत्र्यांना झटका. बोलाची कढी बोलाचा भात, अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी टेस्लाचं स्वागत केलं आहे. टेस्लाची ८ जानेवारी २०२१ रोजी बंगळुरुमध्ये नोंदणी झाली आहे. याचा नोंदणी क्रमांक १४२९७५ आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेविड जॉन फेन्स्टीन कंपनीचे संचालक आहेत.