ठाकरे सरकार लोकांच्या बत्ती गुल करूनच राहणार : किरीट सोमय्या

मुंबई : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. आज सकाळपासून वीज गायब झाली आहे. ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईतील वीज गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. एमएसईबी, बेस्ट आणि अदानीची वीज गेल्यामुळे मुंबई शहरातील कार्यालयांचा कारभारही ठप्प पडला आहे. याचा परिणाम लोकल सेवांवरही झाला असून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. सरकारच्या कृतीशून्य कारभारामुळे आज ही परिस्थिती ओढवल्याचे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

 

काय म्हणाले किरीट सोमय्या

” ठाकरे सरकारच्या राज्यात अंधार ..आज मुंबईत जी विज गेली त्याला ठाकरे सरकार आणि त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार आहे. या सरकारकडे वीज कंपन्यांना द्यायला पैसे नाहीत. त्यामुळे वीज सप्लाय नाही आणि रिपेअरिंच्या कामाचे नियोजन नाही. त्यातच ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये स्पर्धा आहे. कोणी म्हणतय आम्ही ४०० युनिट वीज मोफत देऊ कोणी ३०० युनिट म्हणत आहेत.. लोकांची बत्ती गुल केल्याशिवाय हे सरकार राहणार नाही” , अशा शब्दात भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं आहे.