ठाकरेंनी पवारांनाच अभिषेक करावा; भाजपाचा टोला

उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा. म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा, असे भातखळकर यांनी वारकऱ्यांचा हवाला देऊन म्हटले आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच पायी वारीचा हट्ट धरला होता. कोणत्याही परिस्थितीत पायी वारी होणारच, अशी भूमिका भाजपने घेतली होती.

    मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढीच्या पायी पंढरपूर वारीला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. काही वारकऱ्यांचा या निर्णयाला विरोध आहे. भारतीय जनता पक्षानेही या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत, अशा आशयाचे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना केले होते. राऊत यांच्या या विधानाचा भाजपाने तेव्हा निषेध केला होता. वाचाळवीर राऊत यांनी विठ्ठलनामाचे पावित्र्य घालवल्याची टीका भाजपने केली होती.

    आता महाविकास आघाडीच्या सरकारने पायी वारीवर बंदी घातल्यानंतर भाजपने पुन्हा सरकारला घेरले आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केले आहे. संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याचा आधार घेत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. ‘सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केले आहे.

    उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा. म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा, असे भातखळकर यांनी वारकऱ्यांचा हवाला देऊन म्हटले आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच पायी वारीचा हट्ट धरला होता. कोणत्याही परिस्थितीत पायी वारी होणारच, अशी भूमिका भाजपने घेतली होती.

    मात्र, राज्य सरकारने केवळ मानाच्या पालख्या मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत एसटी बसमधून नेण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे भाजप अधिकच आक्रमक झाला होता. पायी वारीच्या पहिल्या दिवशी आपल्या समर्थकांसह पायी वारीला निघालेले हभप बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले होते. त्यावरूनही भाजपनं सरकारवर टीका केली होती. आता त्याही पुढं जाऊन शासकीय विठ्ठलपूजेवरून भाजपनं मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.