ठाकरे यांनी फडणवीसांचा अजेंडा राबवून जनतेच्या कौलाशी प्रतारणा करू नये : माकप राज्य सचिव, नरसय्या आडाम

भिडे हे विज्ञान विरोधी असून अनावश्यक विधाने करून अंधश्रद्धा विरोधी कायदा मोडत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला वारंवार आव्हान देत आले आहेत,' असेही आडम यांनी म्हटले आहे.

  मुंबई : सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या भेटीला गेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शिवप्रतिष्ठान’चे संभाजी भिडे यांची भेट घेवून बंद दाराआड चर्चा केली होती. या भेटीवरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांनी टिका केली आहे.

  भेट घेणे अत्यंत खेदजनक

  या भेटीबद्दल कॉम्रेड आडम यांनी तीव्र नापसंती व्यक्त करतानाच ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा अजेंडा राबवून जनतेने दिलेल्या कौलाशी प्रतारणा करू नये, असे मत व्यक्त केले आहे. माकपचे राज्य सचिव, माजी आमदार नरसय्या आडाम यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की ‘कोरोनाशी वैज्ञानिक दृष्टीने दोन हात करण्यात पुढाकार घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयी चुकीची, बेलगाम आणि जनतेला मृत्यूच्या खाईत लोटणारी विधाने करणाऱ्या संभाजी भिडे यांची भेट घेणे अत्यंत खेदजनक व धक्कादायक आहे. भिडे हे विज्ञान विरोधी असून अनावश्यक विधाने करून अंधश्रद्धा विरोधी कायदा मोडत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला वारंवार आव्हान देत आले आहेत,’ असेही आडम यांनी म्हटले आहे.

  नेमके कुणी कुणाचे पाय धरले

  त्यांनी पुढे नमूद केले आहे की, २०१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे भिडे यांनी दलित आणि दलितेतर समाजात वितुष्ट निर्माण करून सामाजिक सौख्याचे पालन करणाऱ्या महाराष्ट्र धर्माला भिडे यांनी चूड लावली. या एकाच गुन्ह्यासाठी त्यांची येरवडा तुरुंगात रवानगी करायला पाहिजे होती. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.

  समाजात विष पेरणाऱ्या अशा माणसाची मुख्यमंत्र्यांनी भेट घेणे धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तुरुंगात निरपराध वयोवृद्ध विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते मृत्यूमुखी पडत असताना त्यांच्या छळाला कारण ठरलेल्या भिडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय आश्वासन दिले, हे जनतेला समजले पाहिजे. सांगली दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी या विज्ञान विरोधकाचे पाय धरले होते. या भेटीत नेमके कुणी कुणाचे पाय धरले, हे समजायला हवे,’ असेही आडम यांनी म्हटले आहे.

  Thackeray should not deceive the people by implementing Fadnavis agenda CPI M Secretary of State Narasaya Adam