गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

महाविकासआघाडी सरकारवर विरोधी पक्ष नेते कायमच टीका करत असतात. ज्या पद्धतीने गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. तसं हे सरकार आहे, असं टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं. ते मुंबईत बोलत होते.

  मुंबई : महाविकासआघाडी सरकारवर विरोधी पक्ष नेते कायमच टीका करत असतात. ज्या पद्धतीने गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. तसं हे सरकार आहे, असं टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं. ते मुंबईत बोलत होते.

  दरम्यान भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवर शिवसेनेनं जत्रा अशी टीका केली. मात्र ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना दुसरं काय दिसणार, लोकांचा चांगला प्रतिसाद दिसतोय, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

  पत्रकारांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका निभावली

  शिवस्मारकाबाबत या सरकारने दोन वर्षात काहीही केलं नाही. सरकारने हे गांभीर्याने घ्यायला हवे. सुप्रीम कोर्टात एक स्थगिती आहे ती उठवायला हवी, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पत्रकारांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका निभावली आहे. अनेकांनी पत्रकारांना फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून घोषित केलं आहे. आम्हीही तशी विनंती राज्य सरकारकडे केली होती. इतर राज्यांनी केलं आहे, पण आपल्या राज्यात त्यावर निर्णय झाला नाही, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

  शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडायला व्यासपीठ नाही. काही अधिकारी स्पेशल पोस्टिंगने आलेले आहेत. मंत्रालय येथील शेतकऱ्याची आत्महत्या ही दुर्दैवी आहे. किमान मृत्यूनंतर तरी शेतकऱ्यांचं म्हणणे सरकारने ऐकावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेचं देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

  मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी विलास शिंदे याच्यासह त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सुभाष जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदन करुन ताब्यात घेतला आणि गावी रवाना झाले. भारतीय दंड संहिताचे कलम 306, 34 आणि महासावकारी अधिनियम 45 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सुभाष जाधव यांची पत्नी साधना सुभाष जाधव, मुलगा अजय सुभाष जाधव आणि मुलगी प्रतीक्षा जाधव यांनी सरकारकडे हात जोडून केली आहे. या प्रकरणावरुनही फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.