The appointment of 12 MLAs is a ploy of the Government of maharashtra

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपालनियुक्त १२ जागांची यादी देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एक मोठा डाव खेळला असून राज्यपालांकडे यादी देताना १५ दिवसांच्या मुदतीचीही त्यांनी शिफारस केली. राज्यपालांकडून या मुदतीत काही कार्यवाही झाली नाही, तर राज्यपालांकडे जाब विचारण्याची संधी ठाकरे सरकारला मिळणार आहे.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुंबई.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपालनियुक्त १२ जागांची यादी देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एक मोठा डाव खेळला असून राज्यपालांकडे यादी देताना १५ दिवसांच्या मुदतीचीही त्यांनी शिफारस केली. राज्यपालांकडून या मुदतीत काही कार्यवाही झाली नाही, तर राज्यपालांकडे जाब विचारण्याची संधी ठाकरे सरकारला मिळणार आहे. साहजिकच या यादीबाबत राज्यपालांनी २१ नोव्हेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास महाविकास आघाडीविरोधात राज्यपाल असा आणखी एक सामना राज्यात पहायला मिळणार आहे.

१५ दिवसांत निर्णय घेण्याची शिफारस

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी ६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून देण्यात आली. पण महाविकास आघाडीने ही यादी देताना एक चांगलाच डाव खेळला आहे. राज्यपालांना केवळ नावांची यादी दिली असती तर मग राज्यपाल त्यावर कधी निर्णय घेणार याची महाविकास आघाडीला वाट पहावी लागली असती. त्यामुळे आघाडीने यादी देताना यादीतील नावे १५ दिवसांच्या मुदतीत जाहीर करावीत, अशी शिफारस राज्यपालांकडे केली. २१ नोव्हेंबरला आघाडीने शिफारस केलेली मुदत संपत आहे. साहजिकच या नावावर राज्यपालांना तोपर्यंत निर्णय घ्यावा लागणार आहे. याबाबत काहीच निर्णय राज्यपालांनी घेतला नाही तर त्यानंतर या मुदतीबाबत राज्यपालांकडे विचारणा करण्याची आयतीच संधी महाविकास आघाडी सरकारला मिळणार असल्यामुळे महाविकास आघाडीने यातून एकप्रकारे राज्यपालांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

राज्यघटनेचा आदर करावा

राज्यघटनेप्रमाणे राज्याच्या मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेमध्ये १२ सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार असतो. मुख्यमंत्र्यांनी त्याप्रमाणे १२ नावांची शिफारस यादी राज्यपालांना दिली आहे. राज्यपालांनी या शिफारसीचा आदर केला पाहिजे, असे काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. लवकरात लवकर राज्यपाल नियुक्त बारा जणांच्या नावांची घोषणा केली पाहिजे. यामध्ये उशीर झाला तर यात राजकारण होत आहे, असा चुकीचा संदेश जाऊ शकतो. राजकीय नेत्यांनी काहीही सांगितले असले तरी राज्यपालांनी राज्यघटनेचा आदर केला पाहिजे ही आमची अपेक्षा असल्याचे मतही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.