NIA ची सर्वात मोठी कारवाई, एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. ही कार व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचं समोर आलं.

  एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. ही कार व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचं समोर आलं.

  या प्रकरणात एनआयएनं सविस्तर तपास केल्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यामध्ये सचिन वाझे यांच्यासह मुंबई पोलिसातील दोन कर्मचारी आणि एक बुकी यांचा हात असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानुसार त्यांना एनआयएनं अटक केली. त्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात झालेली ही मोठी कारवाई ठरली आहे.

  प्रदीप शर्मा यांची याआधीही एनआयएनं सविस्तर चौकशी केली होती. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ७ आणि ८ एप्रिल रोजी एनआयएनं प्रदीप शर्मा यांची दीर्घकाळ चौकशी केली. यावेळी त्यांनी शर्मा यांचे जुने सहकारी सचिन वाझे यांना देखील त्यांच्यासमोर आणून चौकशी केल्याचं सांगितलं गेलं.

  वाझेचे आठवे सहकारी अटकेत

  यापूर्वी प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित विकासक संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माचा शोध एनआयए करत होती. राज्य राखीव दलाचे पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहे. प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना एन आयए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सचिन वाझे याला हिरेन हत्या प्रकरणी मदत करणा-या सात जणांना यापूर्वी अटक झाली आहे.

  दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी

  मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया बाहेर स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात यापूर्वी दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याने मोठी कारवाई केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  अपयशी राजकीय पदार्पण

  मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी प्रदिप शर्मा यांनी ११३ गुंडाचे एन्काऊंटर केल्याची नोंद त्यांच्या नावे आहे. जिगरबाज पोलीस आधिकारी म्हणून ते सेवानिवृत्ती नंतर शिवसेनेच्या तिकीटावर २०१९ मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढले, मात्र त्यांचा  पराभव झाला.

  जिगरबाज पोलीस अधिकारी
  १९८३ पासून ते मुंबई पोलिस दलात कार्यरत होते लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात २०१० मध्ये अटक झाली होती, त्यानंतर २०१३ मध्ये प्रदीप शर्मा त्यांची तुरूंगातून सुटका झाली. नंतर त्यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात करण्यात रूजू करून घेण्यात आले. २०१७ मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरची अटक शर्मां यांनीच केली होती.