
मुंबई : मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारनेही लक्ष घालावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार आहेत. राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली.
या बैळकीमध्ये बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित होते.
मराठा आरक्षणाबाबत येत्या २५ जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकार आपल्या रणनितीवर अंतिम हात फिरवत असून, आजवर झालेल्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.