१२ आमदारांच्या निवडीचा तिढा आज सुटणार?; महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यपालांचे भेटीचे आमंत्रण

१२ आमदारांच्या नियुक्तीवरून मागील आठवड्यात महाविकास आघाडी व राज्यपाल यांच्यात चांगलेच राजकीय नाट्य रंगले होते. त्यामुळे आजच्या भेटीत तरीहा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून सुरू झालेला राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र आज महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांनी भेटीसाठी वेळ दिली आहे. या भेटी दरम्यान हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेचे निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.

  मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

  राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतचा वाद मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाली काढला. “या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

  ‘सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा, अशाप्रकारे नामनिर्देशित जागा अनिश्चित काळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत. राज्यपालांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवे . ते कधीपर्यंत द्यावे हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे’ , असेही यावेळी उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

  १२ आमदारांच्या नियुक्तीवरून मागील आठवड्यात महाविकास आघाडी व राज्यपाल यांच्यात चांगलेच राजकीय नाट्य रंगले होते. त्यामुळे आजच्या भेटीत तरीहा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  १२ आमदारात आहे ‘यांचा’ समावेश

  राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.