पळालेल्या कोरोना रूग्णाचा दोन तासांत मिळाला मृतदेह

-शताब्दी हॉस्पिटलच्या गलथान कारभाराचा नातेवाईकांना फटका -नातेवाईकांमध्ये असंतोष मुंबई : बेपत्ता कोरोना रुग्णाचा मृतदेह दोन तासाने हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरही प्रशासनाने रुग्ण पळून गेल्याची

-शताब्दी हॉस्पिटलच्या गलथान कारभाराचा नातेवाईकांना फटका

-नातेवाईकांमध्ये असंतोष

मुंबई :  बेपत्ता कोरोना रुग्णाचा मृतदेह दोन तासाने हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरही प्रशासनाने रुग्ण पळून गेल्याची तक्रार करत क्वारंटाईन असलेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडेच त्यांची चौकशी केली. यानंतरही त्या मृतदेहाची बेवारस नोंद करून कुटुंबियांना शताब्दी हॉस्पिटल प्रशासनाने दिवसभर रुग्णाचा शोध घ्यायला लावले.

अखेर सायंकाळी हा शोध संपल्यानंतरही तब्बल २४ तासानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.हॉस्पिटल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका रुग्णाच्या कुटुंबियांना बसला असून त्याबाबत त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा येथील महाराष्ट्र नगरमधील  साईकृपा चाळ 2 मध्ये राहणारे विठ्ठल मुळ्ये  (वय ८०) यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या शेजाऱ्यांना पालिकेने क्वारंटाईन केले. त्यानंतर सोमवारी सकाळी ८. ३० वाजता क्वारंटाईन असलेल्या मुळ्ये यांच्या नातेवाईकांना ते बेपत्ता झाले असून कुठे आहेत अशी विचारणा करणारा दूरध्वनी हॉस्पिटलमधून आला.

हॉस्पिटलमधून दूरध्वनी आल्यानंतर मुळ्ये यांची मुलगी, नातू भयभीत ज़ाले.  मुळ्ये यांच्या नातू व त्यांच्या शेजारील चाळीतील मित्र संतोष दळवी, सुहास शेलार यांना आजोबांचा शोध घेण्यास सांगितले. कोविड वॉर्डमध्ये कोरोना रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडत असल्याने वॉर्डच्या बाहेर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. असे असतानाही रुग्ण कसा पळाला याचा जाब त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला विचारला मात्र त्यांना काहीच उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी कांदिवली परिसरात दिवसभर शोध घेतल्यानंतर त्यांना सायंकाळच्या सुमारास कांदिवली रेल्वे स्थानकात एक अपघात झाल्याचे समजले. त्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली असता त्यांना हा अपघात सकाळी झाला असून मृतदेह सकाळी ७ वाजताच्या सुमारास शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठवल्याचे सांगण्यात आले. 

त्यामुळे त्यांनी तिकडे धाव घेतली असता मुळ्ये यांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये सकाळी ७ ते ७. ३० वाजताच्या दरम्यान आला असून त्यांची बेवारस म्हणून नोंद करण्यात आल्याचे त्याना समजले. या प्रकाराने मुळ्ये यांच्या कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना धक्काच बसला. शताब्दी हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आमचे आजोबा हॉस्पिटलमधून सकाळी पाच वाजता बेपत्ता झाले. त्याचदरम्यान हॉस्पिटलमध्ये आलेल्या मृतदेहाची खातरजमा करण्याऐवजी त्याची बेवारस नोंद करत आम्हाला दिवसभर शोधाशोध करायला लावल्याचे संतोष दळवी यांनी सांगितले.

संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले असताना रुग्णाची काळजी घेणे हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, सुरक्षारक्षक यांची जबाबदारी असताना त्यांनी आपल्या कामात कुचराई केल्याने आजोबांचा जीव गेल्याचा आरोपही संतोष दळवी यांनी केला. 

२४ तास उलटल्यानंतर दिला मृतदेह मुळ्ये यांच्या नातेवाईकांनी त्यांचा घेतलेला शोध सायंकाळी संपल्यानंतर त्यांना मंगळवारी सकाळी मृतदेह देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्यांना दुपारनंतर मृतदेह देण्यात आला. कोरोनाचे मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक येत नसल्याचा आरोप पालिका हॉस्पिटलकडून करण्यात येतो. मात्र मुळ्ये यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह घेण्यासाठी येऊनही त्यांना मुतदेह देण्यास हॉस्पिटल प्रशासनाकडून विलंब लावण्यात आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.