विधानसभा निवडणूक निकालांवरुन केंद्र सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे; शिवसेना नेते अरविंद सावंत यांची मागणी

  मुंबई :  भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी काल टिका केल्यानंतर शिवसेनेकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर विरोधकांना जर राज्यात सत्तांतर होईल असे वाटत असेल तर बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांवरुन केंद्र सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का? असा सवाल शिवसेना नेते खा अरविंद सावंत यांनी भाजप नेत्यांना केला आहे.

  कुबडी विसरायची म्हणजे कृतघ्नपणा

  कालपर्यंत भाजप शिवसेनेच्या कुबड्यावर होता. आमच्याच कुबड्या आणि शिडी वापरुन भाजप महाराष्ट्रात वाढला. अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता. संघाच्या शाखेवरही दोन माणसे उभी असायची. ही कुबडी विसरायची म्हणजे कृतघ्नपणा असल्याचे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले. बेळगावचा इतिहास माहिती नाही अशा पोरकट लोकांनी आपले ज्ञान पाजळू नये, असा टोलाही सावंत यांनी शेलारांना लगावला.

  तर तावडेंना विचारा

  तर दुसरीकडे शिवसेना प्रवक्ता मनिषा कायंदे यांनी देखील शेलार यांना तुमचे नेते तुमचा टेकू कधी काढून घेतील ते कळणार ही नाही, खोट वाटत असेल तर तावडेंना विचारा असा कुत्सित शेरा मारला आहे. त्यांनी व्टिट करत पुढे म्हटले आहे की, तुमचे दुसरे नेतेअमीत शहा मातोश्रीवर येवून पाहूणचार घेवून गेले यावरून तुमची औकात जगाला माहिती झाली आहे.

  बदनामी करण्यासाठी आरोप

  अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही,  त्यांनी म्हटले आहे की, अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. माणसाचा जीव वाचवण्याचे काम ते करतात, ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, अशा शब्दात शिवसेनेवर धमकी दिल्याबाबत केल्या जाणाऱ्या आरोपांना सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेची बदनामी करण्यासाठी आरोप केला जात आहे. शिवसेनेने धमकी दिली नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे यांना सत्तेवर येण्याची घाई झाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने धडा शिकवला. जो महाराष्ट्राने आधीच दिला होता, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.