मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा कोरोनावर इतका अभ्यास झालाय की ते… अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

मुंबई : कोरोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं हे मिश्किल वक्तव्य केले.

आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला पण त्यांना झालाच नाही.  गंमतीचा भाग सोडा असं म्हणत अजित पवारांनी कोरोना काळ या सरकारने खूप चांगलं काम केलं आहे असल्याचे नमूद केले

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे चांगली वाटचाल करत आहेत. आपलं सरकार पडणार, तीन महिन्यात कोसळणार, सहा महिन्यात कोसळणार हे विरोधक म्हणत राहिले पण त्यांना हे सरकार पाडण्यात यश आलं नाही असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

आता पुढची चार वर्षे महाविकास आघाडी सरकार हे यशस्वी आणि दमदार वाटचाल करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण एकजुटीने काम करतो आहोत यापुढेही आपल्याला असंच काम करायचं आहे. गेल्या वर्षभरात अनेक अडचणी आल्या. तरीही लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असंही अजित पवार म्हणाले.